गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ
श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
गेवराई दि.२१(सुभाष मुळे) : तालुक्यातील
नागझरी जुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक वातावरणात निरोप समारंभ पार पडला. शाळेत गेली अकरा वर्षे कार्यरत असलेल्या श्रीमती भारती गायकवाड व रामप्रसाद कावळे सर यांची बदली झाल्याने शाळा परिसरात आणि गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीमती गायकवाड व कावळे सर यांनी शैक्षणिक कार्यकाळात केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर गावकऱ्यांनाही शिक्षक कसा असावा याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. शिस्त, नवनवीन उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, पालकांशी संवाद, तसेच शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले. गावकऱ्यांच्या मते, “आज आम्ही चांगल्या शिक्षकाला निरोप देतोय, हे खरेतर दुःख आहे. पण त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. मुलांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया घालून दिला. गावातील प्रत्येक नागरिक त्यांचे ऋणी आहे.” असे भावनिक उद्गार पालकांनी यावेळी काढले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन भुसारे, उपाध्यक्ष तानाजी जोगदंड, शिक्षक प्रतिनिधी कृष्णा मडके सर यांच्यासह बळीराम भुसारे, अरुण काळे, आबासाहेब मार्गे, अंकुश नन्हेर, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश मार्गे, संभाजी मार्ग, महादेव जोगदंड, नितीन जोगदंड या मान्यवरांसह गावातील महिला मंडळ व पुरुष मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात गावकऱ्यांनी श्रीमती गायकवाड मॅडम व कावळे सर यांना शुभेच्छा देत भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्या कार्यामुळे शाळेचे व गावाचे शैक्षणिक वातावरण उजळून निघाले असून त्यांचे योगदान विस्मरणीय राहील, असा सूर सर्वत्र ऐकायला मिळाला.
***
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com