डोळ्यातला महापूर!
मायबाप..! या महापुरात
माझे काहीच वाहून गेले नाही
ना गायीचा गोठा, ना जनावरं
ना धान्य ना पोती
माझे काहीच वाहून गेले नाही
ना शेत ना शेतातली माती
ना शेतातील उभे पीक आडवे झाले !
या महापूरात माझे काहीच का वाहून गेले नाही?
..कारण वाहून जाण्यासाठी यातलं माझ्याकडे काहीच नाही!
हो… विश्वास ठेवा काहीच नाही माझ्याकडे!!
मी नग्न भग्न खंगलेला पिचलेला
शतकानुशतके या व्यवस्थेच्या जुलमी महापूरात असाच वाहत गेलेला
हातवरचं पोट माझं ते काय वाहून जाणार?
तुम्ही पाहिला आहे का कधी माझ्याही डोळ्यातला महापूर?
माझ्या भावनेचा फुटलेला बांध?
मी तुमच्याच शेतावर चाकरी करून भाकरी मिळवतो
मी तुमच्याच शेतात राबणारा शेतमजूर
मायबाप करून घ्या ना माझी यातना मंजूर!
मायबाप तुम्ही करा ना पंचनामा माझ्या पोटातील वाताहातीचा!
भुकेनं माझ्या आतड्याचं नुकसान झालंय
पीळ पडलाय त्यांना
मायबाप द्या ना नुकसानभरपाई माझ्या आतड्यांची?
माझ्या तळहाताला लय घट्टे पडलेत अन टाळूला
खड्डा पडलाय ओझं उचलून उचलून
माझंही वाहून जाईल असं काहीतरी द्या मायबाप!
जमिनीचं जरा राहू द्या बाजूला
तुमच्या मनात माणूस म्हणून जागा द्या मायबाप!
मी बी आपलाच हाय!
आपल्या गावातला हाय आपल्याच देशातला हाय!
मायबाप माझ्या शब्दांनी बंड केले तर तुमच्या सुसंस्कृत कानाला रुचेल काय?
मी नग्न भग्न खंगलेला पिचलेला मजूर हाय मायबाप
कवी
प्रा. विकास बळीराम ढोकणे बीड
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com