21/06/25

मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…?-बापूसाहेब ससाणे

मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…?
-बापूसाहेब ससाणे

बीड. दि. 26 ( प्रतिनिधी) – बीड जिल्हा परिषद गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीला कोणता मुहुर्त शोधत आहे तेच कळायला मार्ग नाही..? निवडश्रेणी पात्र शिक्षकांचे कॅम्प लावुन एका महिन्यात आदेश काढू असा विश्वास तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व संघटनाच्या प्रतिनिधी सभेत दिला होता, त्यालाही वर्ष उलटतं आहे. देशपांडे नावाचे त्या विभागाचे लिपिक फक्त कागदपत्र घेऊन बसलेत, त्यानंतर त्यांच्याकडुन कोणतीही अद्ययावत यादी तयार केली गेली नाही की, पदोन्नती समितीच्या बैठकीसाठी संचिका हलवली नाही, आणि त्यांच्या या अनागोंदीला केवळ सध्याचे शिक्षणाधिकारी श्री. फुलारी हेच एकमेव कारणीभूत आहेत.त्यांच्या याच सुस्त आणि ढेपाळलेल्या कारभारामुळे अनेक शिक्षकांना मुख्याध्यापक पदाशिवाय सेवानिवृत्त व्हावे लागले आहे.यात सर्वाधिक मागासवर्गीय शिक्षकांचा तोटा झालेला असुन याप्रकरणी गांभीर्य पूर्वक पावले न उचलल्यास कास्ट्राईब महासंघाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरत नाही असा इशारा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय महासचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब ससाणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
याबाबत सदर प्रसिध्दीपत्रकात बापूसाहेब ससाणे यांनी पुढे असे म्हटले आहे की, गतवर्षी तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी कास्ट्राईब महासंघासह इतर सर्वच शिक्षक कर्मचारी संघटनांशी चर्चा करून प्रलंबित सर्व मुद्द्याचा निपटारा एका महिन्यात करतो म्हणून अभिवचन दिले होते. सदोष असलेल्या मुख्याध्यापक पदोन्नती यादीवरील आरोपांना उत्तर देत ती दुरुस्त ही केली. एका शिक्षकाचे सेवाज्येष्ठतेनुसार यादीत 4थ्या स्थानी नावं येणे अपेक्षित असताना त्यांचे 67 क्रमांकावर नाव गेले होते. कास्ट्राईब महासंघाने प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध करून दिल्यानंतर कित्येक दिवसांनी ती यादी दुरुस्त झाली. पण पदोन्नती समितीच्या बैठकीची वेळ मिळण्यापुर्वीच नवे शिक्षणाधिकारी म्हणून सन्मा.फुलारी रुजु झाले. त्यामुळे त्यांनी आल्यानंतर महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सदर प्रकरणी तातडीने हालचाल करण्याची गरज असल्याचे सांगितले. पण त्यांनी बघतो करतो असे म्हणत वर्ष संपवत आणले. आता आणखी किती प्रतिक्षा करावी लागेल…आणि यासाठी अडचण नेमकी कशाची आहे याबद्दल ते अवाक्षर बोलत नाहीत. जी गोष्ट पदोन्नतीची तीच गोष्ट निवडश्रेणी ची ही आहे.म्हणूनच या आठ दहा दिवसात या दोन्ही प्रकरणात अपेक्षित निर्णय झाला नाही तर कास्ट्राईब महासंघाला नव्या वर्षांत उपोषण, धरणे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रशासनाने याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी असेही शेवटी त्यात म्हटले आहे.
सदर प्रसिध्दीपत्रकावर बापूसाहेब ससाणे यांच्यासह श्रीम. अरुणाताई आठवले, एस. एच. भालेराव, दिलीप स्वामी, दिपक भालेराव,रघुनाथ पवार, विश्वभुषण सोनवणे, एस.वाय. सुतार, बापूसाहेब गायकवाड, दयानंद खोपे,सुनिल सुतार, प्रमोद ससाणे, कामरान शेख, गणेश फड, अमोल आतकरे, विजय डोंगरे, संजय मकसरे, बाळासाहेब बनसोडे, श्रीम. वैशाली शिंदे, बाळासाहेब डोळस, सुभाष भादवे, श्रीहरी केदार, संतोष भाले,उध्दव राख आदिंसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
———–/————

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …