मुलींच्या नोकरीची चिंता; बापाने संपविले जीवन
नाथापूर येथील गोरख देवडकर यांची आत्महत्या
बीड दि.१४(प्रतिनिधी)- ओबीसी आरक्षणाची स्थिती पाहता मुलींना नोकरी मिळते की नाही. याची चिंता असलेल्या एका ५० वर्षीय बापाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीड तालुक्यातील नाथापूर गावात घडली. गोरख नारायण देवडकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोरख देवडकर यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आक्रमक वातावरण पाहायला मिळत असताना बीड तालुक्यातील नाथापूर गावातील गोरख नारायण देवडकर (वय ५० वर्ष) यांना मात्र ओबीसी आरक्षण जाणार असल्याची चिंता लागली होती. मयत गोरख देवडकर यांना पाच मुली आहेत. त्यापैकी तीन मुलींचे लग्न झाले आहेत. तर दोन मुली शिक्षण घेत असताना पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल ? त्यांना नोकरी लागेल का नाही? असा प्रश्न गोरख देवडकर यांना सारखा सतावत होता. मुलींच्या शिक्षणाचे आणि नोकरीची सतत चिंता लागली होती. या चिंतेतूनच त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या कुटुंबायांनी सांगितले. बीड जिल्हा रुग्णालयात देवडकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या दुःखद व दुर्दैवी घटनेमुळे नाथापूर परिसरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने मयत नारायण देवडकर यांच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी होत आहे.
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com