17/04/26

नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख

नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी

पूर परिस्थितीची पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख

बीड दि.२८ (प्रतिनिधी) -बीड शहरात यावर्षी पावसाळ्याने अनेक रस्ते बंद केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागातील गल्ली बोळातील घरामध्ये पाणी शिरले आहे. नियोजनाचा अभाव यातून प्रामुख्याने दिसून येत आहे. नदी आणि नाल्यांचे पात्र लहान करणे, नियमाप्रमाणे रस्ते न सोडणे, अशा गैरप्रकारांना सत्ताधाऱ्यांनी खत पाणी घालणे, केवळ याचा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. त्यामुळे पाहणी करण्यासाठी आलेल्या वर्षानुवर्षी सत्ता उपभोगलेल्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त तथा स्वराज्य जनजागृती परिषदेचे अध्यक्ष ॲड. अजित एम .देशमुख यांनी केले आहे.
बीड शहरात कोणकोणत्या भागात पाणी आलेले आहे, याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. अनेक रस्ते जलमय झाले आहेत. लोकांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. याला जे जबाबदार आहेत, त्यांना जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. जनतेने त्यांच्या दारात जाऊन सत्तेचा उपभोग कसा घेतला, याबाबत विचारायला हवे. बीड शहरातील अनेक नदी नाले यांना नाल्यांचे स्वरूप आणले गेले आहे. यातून बेकायदेशीर रितीने लहान लहान रस्ते सोडून नगरपालिकेच्या कृपेने बांधकाम झालेले आहे. नगर पालिकेतील भ्रष्ट कारभार आणि वेगवेगळ्या ठिकाणी जागा गिळंकृत करणे, यासारख्या उद्योगांचे परिणाम आता जनतेला भोगावे लागत आहेत. अशातच आता वर्षानुवर्षी सत्ता भोगणारे अनेक जण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यात जात असल्याचे चित्र पाहिल्यानंतर त्यांची किव येते. जनतेने वर्षानुवर्ष सत्ता उपभोग करणाऱ्यांना या काळात गल्ली बोळात आल्यानंतर प्रश्न विचारून त्याचे व्हिडिओ व्हायरल करणे आवश्यक आहे. जोपर्यंत शहरातील जनता जागृत होत नाही, तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे विकासाच्या गाथा गाणाऱ्यांना भूतलावर आणून जनतेच्या अडचणी दाखवल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे गल्ली बोळातील नागरिकांनी विकास पुरुषांच्या घरी जाऊन त्यांनी नियोजन काय केले ? याबाबत स्पष्ट विचारणा करायला हवी. जनता नगर पालिकेला टॅक्स देते. जनतेला सुविधा पुरवणे हे नगर पालिकेचे काम आहे. त्यामुळे सुविधा मिळत नसतील, तर त्याविषयी देखील जनतेने आवाज उठवावा, असे आवाहन ॲड. अजित देशमुख यांनी केले आहे.

—————————————————-

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …