19/04/26

ऋतुमान प्रा विकास बळिराम ढोकणे सर यांची कविता

 

                ऋतुमान

आता ऋतूंचे ऋतुमान राहिले नाही
आता चांगले हवामान राहिले नाही

काळे ढग आभाळी कधीही जमू लागले
पावसाचे सरासरी पर्जन्यमान राहिले नाही

ऋतुही बदलत गेले माणसाप्रमाणे
भूतकाळाला वर्तमान राहिले नाही

जिव्हाळ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला
आपुलकीचे वारे गतिमान राहिले नाही

लोक आपुलकीने अहंकार जोपासू लागले
कोणाचेच कोणाला सन्मान राहिले नाही

जगायचे होते ते जगणे राहूनच गेले
आता पुरेसे आयुष्यमान राहिले नाही

आता पै पाहुणा दारावरून वाटं लावतो
आता पूर्वीसारखे चहापान राहिले नाही

दिशाहीन आपण अन सांगतो ग्रहांची दिशा
माणसाला चांगले भविष्यमान राहिले नाही

              प्रा. विकास ढोकणे
                           बीड

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …