ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज
संस्कार आणि संस्कृतीची जोपासना कुटुंबातूनच होते-
वाढदिवस कीर्तनाने साजरा करणे समाजासाठी आदर्शवत
चि. शिवांश पदमुले यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त बेलापुरीत हरीकीर्तन संपन्न
बीड, दि. 24 (प्रतिनिधी): संस्कार आणि संस्कृतीची जोपासना कुटुंबातूनच होते. त्यामुळे ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते मत सुप्रसिद्ध कीर्तनकार गाणसम्राज्ञी रतनाताई गेवराईकर यांनी बेलापुरीत येथे पदमुले पाटील परिवारातील चिमुकल्या चि. शिवांश याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले. यावेळी गाणसम्राज्ञी रतनाताई गेवराईकर यांनी आपल्या रसाळ, ओघवत्या वाणीतून नामस्मरण, अभंग व समाजप्रबोधनात्मक विचार मांडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी शिवसेनेचे कुंडलिक खांडे,
आदी उपस्थित होते.
या बाबत अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील बेलापुरी येथील साधु संत आणि थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा जोपासणारा वारकरी संप्रदायात सदैव स्वतःला झोकून देणारे पदमुले पाटील परिवार आहे. या पदमुले पाटील परिवाराची बेलापुरी आणि पंचक्रोशीत सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रामध्ये मोठी ख्याती आहे. आपल्या चांगल्या गुणांनी आणि वर्तुणुकीने पदमुले पाटील परिवारांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. बेलापुरी गावातील सर्वसामान्यांच्या तसेच गोरगरिबाच्या सुखदुःखात पदमुले पाटील परिवारातील सर्व सदस्य सदैव सहभागी असतात. तसेच पदमुले पाटील परिवारात होणार प्रत्येक कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळे या परिवारात असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात संपूर्ण गावातील संपूर्ण ग्रामस्थ, तरूण- तरुणी, अबालवृद्धासह माता-भगिनी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. काल शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी पदमुले पाटील परिवाराच्या कुटुंबातील चि. शिवांश या चिमुकल्याचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या बदलत्या जीवनशैलीत वाढदिवस म्हणजे केवळ केक, पार्टी व दिखावा अशी संकल्पना रूढ होत असताना, पदमुले परिवाराने हा आनंदाचा क्षण कीर्तन व भक्तिरसाच्या वातावरणात साजरा करून समाजासमोर सकारात्मक उदाहरण ठेवले आहे. या कीर्तन सोहळ्यात ईश्वरकृपेचे स्मरण करत जीवनातील संयम, सदाचार, सेवा व नीतिमत्तेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पदमुले पाटील परिवाराने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भक्तीमय वातावरणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याने परिसरात याचे विशेष कौतुक होत आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार गाणसम्राज्ञी रतनताई पांचाळ गेवराईकर यांचे सुश्राव्य हरीकीर्तन संपन्न झाले. आपल्या रसाळ, ओघवत्या वाणीतून त्यांनी नामस्मरण, अभंग व समाजप्रबोधनात्मक विचार मांडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
अहंकाराचा वारा न लागो’ ही संत नामदेव महाराजांच्या प्रसिद्ध अभंगातील या ओळीवर रतनाताई पांचाळ महाराज गेवराईकर यांनी निरूपण केले. यावेळी बोलताना रतानातई गेवराईकर म्हणाल्या की, ज्याचा अर्थ विष्णूच्या भक्ताला (विष्णुदासाला) गर्व किंवा अहंकाराची बाधा होऊ नये, अहंकार हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असून, तो सर्व दुःखांचे मूळ आहे, त्यामुळे नम्रता आणि ईश्वरभक्तीने अहंकार दूर ठेवण्याची शिकवण यातून दिली जाते. अहंकारामुळे प्राप्त झालेले ज्ञान, यश, बल आणि विद्या यांचा कसा नाश होतो. याचे सविस्तर विवेचन केले. भक्तीमार्ग, नामस्मरण, समर्पण, समर्थांची शिकवणी मुळे अहंकाराचा वारा लागत नाही हे विविध उदाहरणे देऊन सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी संत नामदेव देवाकडे कशी प्रार्थना करतात हे सांगितले. भक्ताला अहंकाराचा वाराही लागू नये. अहंकारावर विजय मिळवण्यासाठी पांडुरंगाचे (देवाचे) नामस्मरण करणे गरजेचे आहे. “मी” कोणीच नाही, सर्वकाही परमेश्वर करत आहे, ही भावना (सोऽहं) बाळगल्याने अहंकाराचा त्याग होतो. सद्गुणांची वृद्धी करण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी अहंकाराचा नाश करणे अनिवार्य आहे.
थोडक्यात, आयुष्यात यश, कीर्ती किंवा ज्ञान प्राप्त झाल्यावरही विनम्र राहणे म्हणजेच अहंकाराचा वारा न लागू देणे होय असे सांगितले.
“संस्कार आणि संस्कृतीची जोपासना कुटुंबातूनच होते. वाढदिवस, लग्नदिन यांसारखे प्रसंग कीर्तन, भजन व सामाजिक उपक्रमांतून साजरे करणे ही आज काळाची गरज निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर समाजासाठी हा आदर्श निर्माण झाला आहे. मुलांवर होणारे संस्कार हे सर्वप्रथम कुटुंबातूनच रुजतात. आई-वडील, आजी-आजोबा यांच्या आचार-विचारांतून मिळणारे संस्कार आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात.“ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते,”असे मत कीर्तनकार गाणसम्राज्ञी रतनताई पांचाळ गेवराईकर यांनी प्रतिपादन केले चि. शिवांश यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रंगलेल्या या कीर्तन सोहळ्यास बेलापुरी व परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी चि. शिवांश याला शुभाशीर्वाद देत या उपक्रमाचे कौतुक केले.समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम या कार्यक्रमामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधान व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. अनेकांनी यापुढे वाढदिवस, लग्नदिन व इतर आनंदाचे प्रसंग सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला.“वैयक्तिक आनंद जर समाजाच्या कल्याणाशी जोडला गेला, तर त्यातून खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडते, अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. चि. शिवांश याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पदमुले पाटील परिवाराने आलेल्या सर्वांना मिष्ठान्न भोजन दिले. अत्यंत शांत, भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात चि. शिवांश पदमुले यांचा प्रथम वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com