24/05/26

बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती

बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’

आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’!

शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती

​बीड दि.03(प्रतिनिधी)-दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला आधुनिक शेतीचे धडे मिळतील, या आशेने शेतकरी कृषी प्रदर्शनाकडे वळला खरा; मात्र तिथे गेल्यावर त्याच्या पदरी घोर निराशा पडली आहे. छत्रपती संभाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या या प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानाऐवजी चक्क दक्षिण अमेरिकेचा ‘इग्वाना’ जातीचा सरडा मुख्य आकर्षण ठरत असल्याने, “सरकार आता सरडे पालनासाठी अनुदान देणार आहे का?” असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
‌‌​महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे मोठमोठ्या होर्डिंग्जद्वारे मार्केटिंग करण्यात आले. ५.५ फुटी परदेशी सरडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांकडून चक्क ५० रुपये प्रवेश शुल्क उकळले जात आहे. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात, तिथे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साधन दाखवण्याऐवजी एका सरड्याचे प्रदर्शन मांडणे हा निव्वळ व्यापारी अट्टाहास असल्याची टीका होत आहे.

​शेतकऱ्यांचे सवाल आणि आयोजकांचा गोंधळ

​प्रदर्शनात प्रगत बियाणे, खते, सौर ऊर्जा किंवा सिंचनाचे आधुनिक प्रयोग अपेक्षित असताना, आयोजकांनी एका सरड्याला केंद्रस्थानी ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून ​सरडा दाखवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार का? ​कृषी विभागाच्या नावाखाली खासगी लोकांचे खिसे भरण्याचे हे दुकान आहे का? ​दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली लूट का?
​”शेती संकटात असताना आम्हाला नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे. पण इथे ५.५ फुटी सरडा दाखवून आमची थट्टा का केली जात आहे. सरकार शेळी आणि कुक्कुटपालनासारखं आता सरडे पालनाचं प्रशिक्षण देऊन अनुदान देणार आहे का? हे प्रदर्शन आहे की सर्कस?” असे अनेक प्रश्न संतप्त शेतकरी वर्गातून उपस्थित केले जात आहेत.

​कृषी विभागाची ‘डोळेझाक’

​शासकीय सहभाग असूनही कृषी विभाग या प्रकारावर मूग गिळून गप्प आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झाले खरे, पण आत गेल्यावर शेतकऱ्यांना शेतीपेक्षा प्रदर्शनाच्या नावाखाली व्यवसाय जास्त सुरू असलेला दिसून येत आहे. हा व्यावसायिक बाजार तातडीने थांबवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. ​बीडच्या मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून, कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

कृषी प्रदर्शन की सरळ लूट

शेतकऱ्यांकडून ५० रुपये वसुली हा कोणता न्याय? ज्ञानाच्या नावाखाली उघड धंदा दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाची थेट आर्थिक पिळवणूक सरकारी सहभाग असूनही तिकीटबाजी जबाबदार कोण?
“शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात प्रवेश शुल्क घेणे म्हणजे माणुसकीचा अपमान!”
शेतकरी लुटला जातोय आणि व्यवस्था गप्प का? अशा शेकडो सवालांची सरबत्ती
शेतकरी वर्गातून होत असताना आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

Check Also

ड्रोन, CCTV आणि भरारी पथकांच्या पहाऱ्यात दहावी–बारावी परीक्षा होणार! परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

ड्रोन, CCTV आणि भरारी पथकांच्या पहाऱ्यात दहावी–बारावी परीक्षा होणार! परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल …