21/06/25

आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

बीड दि. 31 (प्रतिनिधी)-
राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांनी दिले होते. परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले. टप्पा वाढ देण्याचे आश्वासन शासनाने न पाळल्यामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांत संतापाची लाट उसळली असून संतप्त झालेल्या सर्व शिक्षकांनी आज दि.01 ऑगस्ट पासून राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैजनाथ चाटे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे,औरंगाबाद विभागाचे निरीक्षक तुकाराम शिंदे, विभागीय संघटक पंकज कळसकर, बीड जिल्ह्याचे मार्गदर्शक लक्ष्मण जगताप, मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्ष मुक्ता मोटे मॅडम, चौरे मॅडम, बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा गायकवाड मॅडम, प्रताप देशमुख यांनी केले.
गेली पंधरा वर्षांपासून राज्यामध्ये विना अनुदानित तत्त्वावर हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करत आहेत. या शिक्षकांनी अनुदान मिळविण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी शेकडो आंदोलन केली आहेत. शेकडो आंदोलन केल्यानंतर या शाळेतील शिक्षकांना 2016 साली 20 टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर तीन-चार वर्षांनंतर पुढील 40 टक्के अनुदानाचा टप्पा मिळवण्यासाठी वाट पाहावी त्यानंतर 60 टक्क्याच्या वाढीव टप्पा अनुदानसाठी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन करावे लागले. दरम्यान 80 टक्के अनुदान टप्पा वाढीसाठी राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबई आझाद मैदानावर मोठे आंदोलन केले होते. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 01 जानेवारी 2024 पासून टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु शासनाचे या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे 80 टक्के टप्पा वाढ अनुदान मिळाले नाही. दरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने अनुदान टप्पावाढीची प्रक्रिया थांबली. 4 जून पासून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहिता संपुष्टात येताच पुढील टप्पा वाढ केली जाईल असे आश्वासन दिले. पावसाळी अधिवेशनात निधीसह पुढील टप्पा वाढ होईल असे शासनाकडून विना अनुदान शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात होते. दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला भर पावसामध्ये विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. यावेळी शासनाने निश्चित आम्ही या अधिवेशनात टप्पा वाढ देणार आहोत. त्यामुळे हे आंदोलन तातडीने मागे घ्यावे असे आवाहन केले. शासनाच्या आश्वासनावर सुरू असलेले हे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. अधिवेशनात शासनाने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना टप्पा वाढ न देता पुन्हा एकदा अनुदानाचे गाजर दाखवून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. शासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळे राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली. संतप्त झालेल्या शिक्षकांनी विविध प्रकारचे आंदोलने करून 31 जुलै पर्यंत अनुदानाच्या वाढीव टप्प्याचा शासन आदेश काढून जून महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अन्यथा 01 ऑगस्ट पासून राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काल 31 जुलै ही मुदत संपुष्टात आल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी राज्यात आज दिनांक 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैजनाथ चाटे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, औरंगाबाद विभागाचे निरीक्षक तुकाराम शिंदे, विभागीय संघटक पंकज कळसकर, बीड जिल्ह्याचे मार्गदर्शक लक्ष्मण जगताप, मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्ष मुक्ता मोटे मॅडम, दैवशाला मुंडे मॅडम, सुरेखा गायकवाड मॅडम, बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर, जिल्ह्याचे पदाधिकारी श्री सौंदलकर सर,श्री शेख सर, दीपक गरूड सर, रविंद्र भुकन सर, रामदास जामकर सर, बीड तालुकाध्यक्ष भागवत यादव सर, मोरे सर, बाळासाहेब नागरगोजे सर, प्रताप देशमुख सर, श्री. श्रीराम जाधव सर, श्री. गोविंद आघाव सर, श्री. भालके सर, सुरेश कदम सर, जावेद पठाण सर, मुंडे सर, यांच्यासह आदींनी केले आहे
___________________________

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …