21/06/25

शिक्षक दिनी शिक्षक उतरणार रस्त्यावर ५ सप्टेंबर रोजी राज्यात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन व रास्ता रोको आंदोलन

शिक्षक दिनी शिक्षक उतरणार रस्त्यावर

५ सप्टेंबर रोजी राज्यात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन व रास्ता रोको आंदोलन

बीड दि.४(प्रतिनिधी)-
राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी कोल्हापूर येथील
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे मागील ३३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागील ८ दिवसांपासून विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर व कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षा नेहा भुसारी मॅडम यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्यातील कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू आहे. कोल्हापूर सह राज्यातील विविध जिल्ह्यात
एवढी आंदोलन करून ही शासन जाणून बुजून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी
रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये पुणे – बेंगलोर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले.
राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश काढावा, जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. गेली काही दिवसांपासून कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण या व कोणत्याच आंदोलनाची शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शाळा कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्यासाठी शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नेहा भोसरी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा नववा दिवस आहे. नऊ दिवस झाले तरी शासनाने अनुदानाच्या वाढीवर टप्प्याचा ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील सर्व शिक्षकांनी कोल्हापूरमध्ये रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनी हजारो शिक्षक पुणे बेंगलोर महामार्गावर रस्ता रोको करणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो शिक्षक कोल्हापूर मध्ये उपस्थित राहणार आहेत. या रास्ता रोको आंदोलनासाठी राज्यातील जास्तीत जास्त शिक्षक, महिला शिक्षिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्यासह पदाधिकारी यांनी केले आहे.

चौकट
कृती समितीचे सोलापूर, नांदेड, बीड, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, धुळे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पदाधिकारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.

चौकट
महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार

सध्या राज्यामध्ये विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे सुरू असलेले आंदोलन म्हणजे आरपारची लढाई असे चित्र निर्माण झाले आहे. आता नाही तर कधीच नाही त्यामुळे या आंदोलनात महिला शिक्षिका कमरेला पदर खोसून आंदोलनात उतरल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातून महिला शिक्षिका मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. ________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …