अंशतः अनुदानित शाळांना
डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्याबीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी
बीड दि.16 (प्रतिनिधी)-
मागील काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के टप्पा वाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवार दि.14 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश सुद्धा शासनाने काढला आहे. हे अनुदान वितरित करताना शासनाने शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 ची संच मान्यता लागू केली. त्यामुळे या सर्व शाळांना वाढीव टप्पा अनुदान मिळवण्यासाठी शैक्षणिक वर्ष सन 2024 -25 ची संच मान्यता असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने शैक्षणिक वर्ष सन 2024-25 ची संच मान्यता डिसेंबर पूर्वी जनरेट करून वितरित करावी अशी मागणी बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिका-ऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा. यासाठी मागील कित्येक दिवसापासून विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात आले.
शाळा कृती समितीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासनाने टप्पा वाढी संदर्भात निर्णय घेतला नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनाच्या आधीपासून आंदोलनाला सुरुवात केली. पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री यांनी अनुदानाचा टप्पा देण्यासंदर्भातली विधिमंडळात घोषणा केली. परंतु अनुदानापासून या शिक्षकांना पुन्हा वंचित ठेवण्याचा शासनाने जाणून-बुजून प्रयत्न केल्याचे या घोषणेवरून लक्षात येताच
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने 70 दिवस धरणे आंदोलन केले. या 70 दिवसांत कृती समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तब्बल 70 दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आंदोलनाच्या 71 व्या दिवशी शासनाने विना अनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनकर्त्या शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका घेत गुरुवार दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत
20% टप्पा वाढीचा निर्णय घेतला. या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ग तुकडया यांना पुढील 20% वाढीव टप्पा अनुदान 01 जून 2024 पासून देण्यात यावे व सदरचे अनुदान शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 ची संच मान्यते मधील मान्यपदांना देण्याबाबत निर्णयामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 मधील 30 सप्टेंबर 2024 रोजीची पटसंख्या ग्राह्य धरुन राज्यातील सर्व शाळांची संच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने जनरेट करुन डिसेंबर 2024 पर्यंत द्या
अशी मागणी बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, छत्रपती संभाजीनगरचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे,
छत्रपती संभाजी नगरचे निरीक्षक विजयसिंह शिंदे, बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ, जेष्ठ मार्गदर्शक बापुराव घुले
बाळासाहेब सानप, नामदेव मुंडे प्रल्हाद कुलकर्णी, सुरेश कदम,
राजेश गदळे यांनी केली. यावेळी शाळा कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_______________________