महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपात्रित पदभरती परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार
बीडमध्ये 14 उपकेंद्रावर 4479 परीक्षार्थी
बीड, दि. 31 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण 14 उपकेंद्रामधून सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 4 हजार 479 उमेदवार बसलेले आहेत.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 14 उपकेंद्रप्रमुख 14 मदतनीस 65 पर्यवेक्षक 217 समवेक्षक असे एकूण 310 अधिकारी, कर्मचारी यांची जिल्हाप्रशासनाद्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱी यांना दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी समाज कल्याणच्या सभागृह बीड येथे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा केंद्र प्रमुख यांनी परीक्षेच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले आहे.
100 मीटर परिघात मनाई आदेश
परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई आहे. आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारांना जेवणाचा डबा, अल्पोपहार व पाण्याची बॉटल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. पेपरच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमून दिलेल्या परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत त्यांचे स्वतःच्या आधारकार्ड, निवडणूक आयोगाची ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
उमेदवारांना त्यांच्या परीक्षा व उपकेंद्रावर परीक्षेकरिता सकाळी 8.30 वाजता उपस्थित राहावे. सकाळी 10.30 वाजता नंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव प्रवेश देण्यात येणार नाही, असे निवास उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा केंद्र प्रमुख शिवकुमार स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
**************************