25/06/26

बीडमध्ये कटिंग आणि दाढी महागली! महागाईच्या भस्मासुरामुळे नाभिक संघटनेचा मोठा निर्णय; नवीन दरपत्रक जाहीर

बीडमध्ये कटिंग आणि दाढी महागली!

महागाईच्या भस्मासुरामुळे नाभिक संघटनेचा मोठा निर्णय; नवीन दरपत्रक जाहीर

बीड, दि. 23 (प्रतिनिधी) – ​आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सलून सेवांवर झाला आहे. वाढती महागाई, दूकानाचे भाडे, वीज बिल, पाणीपट्टी, कारागिरांचे वेतन, तसेच सलूनमध्ये लागणारे शॅम्पू, हेअर कलर, फेशिअल साहित्य, ब्लेड, टिश्यूपेपर,
सौंदर्यप्रसाधन, कॉस्मेटिक आणि इतर साहित्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली त्यामुळे बीड जिल्ह्यातील सलून व्यवसायिक बांधवांनी ग्रामीण व शहरी भागातील सलून सेवांच्या दरांमध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता नागरिकांना कटिंग, दाढी व इतर सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
बीड येथील हॉटेल नीलकमल येथे शनिवार दिनांक 20 जून रोजी ज्येष्ठ मार्गदर्शक धर्मराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष किशोर (भाऊ) गाडेकर, मुकुंद काळे, विठ्ठल घोडके, दिलीप वखरे, नागेश टाकळकर, गौतम नाना बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नाभिक आरक्षण कृती समिती व बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला समाजातील व्यावसायिक व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत वाढती महागाई, दुकानभाडे, वीजबिल, कर्मचारी वेतन तसेच दर्जेदार सौंदर्यप्रसाधनांच्या वाढलेल्या किमतींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यवसाय टिकवण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य नाभिक समाज बांधव संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून सुनिल दोडके, उपाध्यक्षपदी अशोक दोडके, उपाध्यक्ष, राजेंद्र शिंदे, सचिव ,बापू झांबरे आणि संघटक म्हणून बाळासाहेब जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून सुनिल दोडके ह्यांची ही सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी नुतन पदाधिका-यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

“दरवाढीशिवाय पर्याय नाही” – किशोर गाडेकर

“दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सलून व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढले असून, दुकानभाडे आणि इतर खर्चही वाढले आहेत. अशा परिस्थितीत व्यवसाय टिकवण्यासाठी अत्यंत नाईलाजास्तव दरवाढ करावी लागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष किशोर भाऊ गाडेकर यांनी सांगितले.”

ग्राहकांना दर्जेदार, स्वच्छ आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध –
सुनील दोडके

सध्या महागाईने सर्वसामान्यांसह छोट्या व्यावसायिकांनाही मोठ्या संकटात टाकले आहे. सलून व्यवसायासाठी लागणारे सौंदर्यप्रसाधने, वीजबिल, दुकानभाडे, पाणीपट्टी तसेच इतर साहित्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत व्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याने सर्व समाज बांधवांच्या सहमतीने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकण्यासाठी नसून, दर्जेदार, स्वच्छ आणि सुरक्षित सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ग्राहकांनी या निर्णयाला समजून घेऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. भविष्यातही ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नाभिक समाज कटिबद्ध राहील असेही नूतन अध्यक्ष सुनील दोडके यांनी सांगितले.

ग्राहकांना दर्जेदार व सुरक्षित सेवा!

“अधिक सुविधा… अधिक गुणवत्ता…” या संकल्पनेवर आधारित ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. सलून मध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.

नवीन सुधारित दरपत्रक
सेवा नवीन दर

साधी कटिंग
₹150
स्टाईल कटिंग
₹170
स्पेशल दाढी
₹80
फोम / स्टाईल दाढी
₹100
लहान मुलांची कटिंग
₹120 ते ₹130
मुलींची कटिंग
₹200
हेअर स्पा
₹700
बिगेन कलर
₹650

संघटनेने घर पोहोच (होम सर्व्हिस) सेवे साठीही नवीन नियम लागू केला असून, अशा सेवांसाठी मूळ दराच्या दुप्पट शुल्क आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील दोडके, उपाध्यक्ष अशोक दोडके व राजेंद्र शिंदे, सचिव बापू झांबरे आणि संघटक बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आला. संघटनेच्या या निर्णयाचे शहरातील नाभिक बांधवांनी स्वागत केले असून, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

ग्राहकांच्या खिशाला झळ, पण व्यावसायिकांची मजबुरी

​या नव्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागणार असली, तरी गुणवत्ता आणि सुविधा चांगल्या राहिल्या तर ग्राहक निश्चितच या दरवाढीला सहकार्य करतील, असा विश्वास सलून व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. महागाईच्या या कत्रीत एकीकडे सामान्य जनता होरपळत असताना, दुसरीकडे आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी नाभिक समाजाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे चित्र दिसत आहे.

महागाईचा थेट परिणाम आता सलून व्यवसायावरही दिसून येत आहे. कटिंग, दाढी आणि इतर सेवांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या मासिक खर्चात वाढ होणार असली, तरी वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अपरिहार्य असल्याचे नाभिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
___________________________

Check Also

बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती

​बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो …