ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड
*गणेश गुजर डोंगरकिन्ही*
शिक्षक म्हणजे समाज,भावी पिढी, नागरीक घडविण्याची जबाबदारी असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व असते. शिक्षकी पेशा हा ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातील एक व्रत आहे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्याचे सार्थक करणारा पेशा म्हणून ही याकडे पाहिले जाते. त्यामुळे सृष्टी निर्माण झाल्यापासून वर्षापासून समाजामध्ये विशेषतः विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षकाप्रती असलेली आपुलकी मानसन्मान आजच्या घडीला दिसून येतो. पाटोदा तालुक्यातील आदर्श शिक्षक तथा आदर्श मुख्याध्यापक म्हणून
नावाजलेले व्यक्तिमत्व असणारे
स्वर्गवासी साहेबराव शंकरराव साठे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पाटोद्यासह बीड जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हे हितचिंतकांनी हळहळ व्यक्त केली. या वेळी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी साठे गुरुजी विषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या शिदोरीवर आम्ही कसे आजही यशस्वी आहोत हे सांगितले. साठे गुरुजींच्या काळातील शिक्षणाची आजच्या शिक्षणपद्धतीशी तुलना केली तर आजच्या माॅडर्न शिक्षण पध्दतीला सरस ठरणारी साठे गुरूजींची शिक्षण पध्दती होती असे प्रामुख्याने जाणवते. कारण त्या काळासारखी संस्कारीत पिढी घडत होती तशी पिढी आज का घडत नाही असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा कुठंतरी वाटते साठे गुरुजी सारख्या आदर्श गुरुजींची आज समाजात कमतरता आहे. त्याच सोबत शिक्षकी पेशाला आज व्यवसायाचे स्वरूप आल्यामुळे समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती साठे गुरुजींसारख्या गुरुजींची…
एक आदर्श, वैचारिक अभ्यासू व कर्तृत्ववान विद्यार्थी घडवणारे शिक्षक आज हवे आहेत. विद्यार्थ्यांनी नुसते पुस्तकी ज्ञान प्राप्त करु नये असं साठे सर नेहमीच म्हणायचे.व त्या धर्तीवर अध्यापनाचे कार्य करायचे.
मुळचे देव दैठणचे रहिवासी असलेले साठे सर यांचे संपूर्ण आयुष्य पाटोदा तालुक्यात गेले. घरात शिक्षणाचा अंशही नव्हता. हातावर पोट असलेल्या अत्यंत गरीब घरात साठेसरांचा जन्म झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण नंतर खर्डा येथे माध्यमिक शिक्षण चालु असतानाच त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची नोकरी मिळाली तो काळ ६६ च्या दशकाचा होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात प्रथम नियुक्ती.तांडा वस्तीवरील रस्ते नसताना त्यांनी नोकरी केली. ७७च्या दशकात पाटोदा तालुक्यातील पांगरी येथील शाळेतच अर्धी अधिक सेवा झाली.याच काळात त्यांचे डोंगरकिन्ही येथे अनेक वर्ष वास्तव होते. त्यांच्या पाचही मुलांनी डोंगरकिन्ही असलेले नाते जपले आहे.पूर्वी खुपचं कमी पगार असायचा हलाखीच्या परिस्थितीत ते संसाराचा गाडा ओढत होते. त्यानंतर काळात ते पाटोदा येथे कायम स्थायिक झाले.त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतलाबाई यांची खंबीर साथ मिळाली.साठे सरांचे पाचही मुले पाटोदा तालुक्यात सर्वपरिचित. शांत, संयमी, शिक्षणाचे महत्व , सामाजिक बांधिलकी जपणे हे बाळकडू बालपणी पासूनच गुरुजी कडुन मिळाले ते आजतागायत ते जप्त आहेत.त्यांचे चिरंजीव शिक्षणाचा दर्जा सांभाळत चळवळीतील कार्यकर्ते झाले व संबंध निर्माण झाले व माहिती जिद्द चिकाटी च्या प्रयत्न मुळे चारही मुले आज शासकिय नोकरीत आहेत.
साहेबराव साठे हे फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीने प्रभावित झालेले व्यक्तिमत्त्व व आंबेडकरी चळवळीचा आरसा होते.संस्कार व आपुलकी जिव्हाळा जपणारा एक वैचारिक व्यक्तिमत्त्व म्हणुन साठे सरांची ख्याती आहे.सामाजिक स्थैर्यासाठी झटणारे साठे सर समाज व नातेवाईक यांच्या गराड्यात असत.गुरुजींनी सामाजिक बांधिलकी जपताना 30 सप्टेंबर 1993 मध्ये लातूर जवळील किल्लारी येथे मोठा भूकंप झाला होता यामध्ये सात हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला होता. या घटनेने गुरुजी फार दुःखी झाले.त्यावेळी त्यांनी आपले पूर्ण वेतन मदतीसाठी दान केले त्यावेळेचे बीड जिल्हाधिकारी यांनी साठे गुरुजी यांना बोलावून घेऊन यथोचित सत्कार करून कौतुक केले. कुटुंबवत्सल , समाजप्रिय व आपल्या मुलांना परोपकारी वृत्ती जपावे अशी दिशा देणारे साहेबराव साठे यांचे वृद्धापकाळाने 30 जून रोजी निधन झाले.त्यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम 4 जुलै गुरुवार रोजी पाटोदा जवळ घुमरा पारगाव येथे पार पडला. यानिमित्ताने त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती लाभो.
साठे परिवाराच्या दु:खात सा. संघर्ष यात्रा परिवार सहभागी आहे.