06/09/25

पुतण्यांसमोर काकांची माघार, दोन भावांमध्ये होणार लढत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

पुतण्यांसमोर काकांची माघार,
दोन भावांमध्ये होणार लढत

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

बीड दि.४(प्रतिनिधी) : बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर घराण्यातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या दोन पुतण्या पैकी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तर दुसरे पुतणे डॉ योगेश क्षीरसागर यांनी महायुतीच्या वतीने अर्ज दाखल केल्यानं एकाच कुटुंबातले तिघे जण आमने सामने होते. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र काका पुतण्यांच्या लढाईत काकांनी माघार घेतली. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता बीड मतदार संघात दोन भावांमध्ये आता लढत होणार आहे.
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातल्या बीड मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. महायुतीत बीड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मिळाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्षम कार्यकर्ते डॉ. योगेश क्षीरसागर यांना तिकीट देण्यात आलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून डॉ योगेश यांचे चुलत भाऊ विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना तिकीट देण्यात आले. क्षीरसागर बंधूंचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. त्यातच मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काकांनी माघार घेतल्यामुळे दोन भावांमध्ये लढत होणार आहे. या लढतींमध्ये काका कोणती भूमिका घेतात कोणत्या पुतण्याला रसद पुरवतात हे काही दिवसात स्पष्ट होईल.
___________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …