बीड बस स्थानकासमोरील अवैध धंदे रोखण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितलकुमार बल्लाळ अपयशी
बीड दि.५ (प्रतिनिधी)-बीड बस स्थानकासमोरचा परिसर प्रवाशांच्या वर्दळीने सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या परिसरात चहा- नाष्टा आणि जेवण यासह इतर व्यावसायिकाचे उद्योग जोरात चालतात. या व्यवसायातुन व्यवसायीकांना चांगली कमाई होते. परंतु मागील काही दिवसांपासून या परिसरात अवैध धंद्यांला उत आला आहे. या परिसरात अक्षरशः अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. बस स्थानक आणि परिसराला अवैध धंद्यांनी विळखा घातला आहे. या अवैध धंद्यामुळे सामान्य नागरिकांसह प्रवासी महिलांना आणि मुलींना येणे-जाणे कठीण झाले आहे. बस स्थानक आणि परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बीड शहर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितल कुमार बल्लाळ यांनी रोखणे गरजेचे होते. परंतु या परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात शितलकुमार बल्लाळ यांना पूर्ण अपयश आले आहे की त्यांच्या आशीर्वादाने हे सुरू आहेत असा प्रश्न पडू लागला आहे. थोडक्यात त्यांच्या कारकिर्दीमध्ये बीड शहराच्या वेशीवर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. बीड शहराची मराठवाड्याच्या वेशीवर इभ्रत घालणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पाठीशी न घालता तातडीने त्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
बीड शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितल कुमार बल्लाळ बीड शहरांमध्ये सातत्याने छोट्या मोठ्या कारवाई करून सतत वर्तमानपत्रात प्रसिद्धीच्या झोतात असतात. प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या शितल कुमार बल्लाळ यांच्या आशीर्वादाने बीड बसस्थानक परिसरात अवैध धंद्यानी मोठ्या प्रमाणावर बस्तान बसवले आहे. या परिसरात मटका, जुगार, दारू, अवैध प्रवासी वाहतूक, चक्री, ऑनलाइन लॉटरी, गुटखा यासारख्या धंद्यांनी जोर धरला आहे. बस स्थानक परिसरात भागात चालणाऱ्या या धंद्यामुळे बीड शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या इज्जतीची लक्तरे मराठवाड्याच्या वेशीवर टांगली जात आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकाराची दखल घेऊन बीडच्या इभ्रतीचा होणार पंचनामा रोखावा या कामी अपयशी ठरलेल्या बल्लाळ यांची बदली करून खमक्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होऊ लागली आहे.
____________________________