प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे- दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम
दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी
विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन
बीड दि.30 (प्रतिनिधी)- शाळा महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे, यासाठी त्यांनी आपल्या दररोजच्या वापरातल्या वस्तूंचा वापर करावा असे आवाहन दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव मॅडम यांनी केले.
बीड जिल्ह्यातील दामिनी पथकाच्या प्रमुख सपोनि पल्लवी जाधव मॅडम यांनी
दिनांक २५/०८/२०२५ रोजी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात तर दिनांक २८/०८/२०२५ रोजी बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथील गोरक्षनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास भेट दिली. याप्रसंगी या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी त्यांनी संवाद साधला. या वेळी बोलताना सपोनि पल्लवी जाधव मॅडम म्हणाल्या की सध्या महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. एखादी वाईट घटना घडत असतांना आपल्याला कोणी मदत करेल, याची वाट न पाहता मुलींनी स्वत:च सशक्त व्हावे. तसेच स्वत:चे संरक्षण कसे करावे याचे धडे घेऊन वाईट प्रवृत्तीचा सामना करावा. मुलींना शिक्षण हा मोठा आधार आहे. मुली उच्च शिक्षित होऊन आपल्या पायावर उभ्या राहिल्या तर निश्चितच महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच योग्य वयातच विवाह होणे आवश्यक आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. कधी-कधी तर मुलींचे आयुष्यही यातून उदध्वस्त होते. त्यामुळे मुलींनीच पुढे येऊन बालविवाह पध्दतीचा विरोध करायला शिकले पाहिजे, शिक्षण घेत असताना प्रामुख्याने आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे मोबाईलचा अतिवापर टाळावा असे आवर्जून सांगितले. तसेच त्यांनी येथील मुलीसह विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम, गुडटच-बॅडटच, महिलांना भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार या कायद्याबाबत माहिती दिली.
तसेच धुम्रपान करू नये, मोबाईलचा अतिवापर टाळावा, अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी तत्काळ मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाईन ११२, १०९१, १०९८ वर कॉल करणे तसेच ऑफिस कडून तयार करण्यात आलेला QR कोड वर तक्रार करणेबाबत माहिती सांगितली. यावेळी ५०० ते ६०० विद्यार्थी हजर होते.
________________________________
दोन महिन्यात शंभर पेक्षा जास्त
रोडरोमियोवर केली कारवाई !
रोड रोमिओ मध्ये भीतीचे वातावरण
दामिनी पथकाने बीड शहरात तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी जावून बस स्टँड, शाळा, कॉलेजच्या समोर, क्लासेस अशा वर्दळीच्या ठिकाणी गस्त करुन, मागच्या दोन महिन्यात १०० पेक्षा जास्त रोडरोमियोवर मुंबई पोलीस अधिनयम अन्वये ११०/११७ नुसार प्रतिबंध कारवाई केली आहे. त्यामुळे रोड रोमिओ मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.