कपिलधारवाडी येथून मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी
चटणी-भाकरीची शिदोरी मुंबईला रवाना
बीड दि.1 (प्रतिनिधी)-मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण चळवळीतील संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांना साथ देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सरकारने आझाद मैदान परिसरातील हॉटेल बंद ठेवले असल्याने आंदोलन कर्त्याच्या जेवण-पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील गावकऱ्यांनी आंदोलकांसाठी शिदोरीची मोठी व्यवस्था केली.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुढाकार घेत आहेत. या पुढाकारात कपिलधारवाडी ग्रामस्थांनी आंदोलन स्थळी भाकरी, ठेचा, कांदा, भात व पाणी यांची शिदोरी पाठवली आहे. शेतकरी व गृहिणी स्वतः बनवलेले जेवण आंदोलकांपर्यंत पोचवत असून, “आंदोलन हे आपल्यासाठीच आहे” या भावनेतून ही मदत केली जात आहे. ग्रामीण संस्कृतीचा आणि एकोपा दाखवणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास्पद ठरत आहे. भाकरी-ठेच्याच्या साध्या पण पौष्टिक शिदोरीमुळे आंदोलकांचा उत्साहही दुणावला आहे. ही शिदोरी फक्त जेवणापुरती मर्यादित नसून, मराठा समाजाच्या ऐक्याचे प्रतीक मानली जात आहे.
Post Views: 95
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com