योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे
श्री महालक्ष्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वज्रासन, उत्तानासन, भुजंगासनाचे दिले धडे
बीड दि.२१(प्रतिनिधी)- योग मन:शांतीचा, निरोगी शरीराचा आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग आहे. या योगामुळे निरोगी शरीर निर्माण होते. निरोगी मनासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी योगासन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी दररोज किमान एक तास योगासन करावेत असे आवाहन योगगुरु डॉ. संजय तांदळे यांनी जागतिक योग दिनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय चव्हाण सर होते. तर व्यासपीठावर श्री. आत्माराम वाव्हळ सर, श्रीमती फाटे मॅडम, श्रीमती साळुंके मॅडम, श्रीमती सानप मॅडम श्री गणेश गुजर सर आदी उपस्थित होते.
बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात २१ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत योग प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी योगगुरू डॉ. संजय तांदळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. यावेळी त्यांनी योगा बद्दल अधिक माहिती देत योगासनांचे फायदे सांगितले. या वेळी बोलताना योगगुरू डॉ संजय तांदळे म्हणाले की, भारत देशाने जगाला योगाची देणगी दिलेली आहे. आज जगातील अनेक देशातील नागरिक योगासनाचे धडे दररोज घेत आहेत. परंतु आपल्या देशातील नागरिक मात्र या योगा कडे दुर्लक्ष करत आहेत. दुसरीकडे पाश्चिमात्य देशांच्या नको त्या गोष्टींचे अनुकरण करत आहे. या पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणामुळे आपल्या देशातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आज घराघरातील अनेक नागरिक विविध आजारांना बळी पडले आहेत. अशा काळात आपलं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असेल तर योगासन करणे आवश्यक आहे. योगामुळे निरोगी शरीर तयार होते. या निरोगी शरीरात निरोगी मन निर्माण होते. या निरोगी मनातून सुविचार उत्पन्न होतात. सुविचारमुळे समाजाची आणि देशाची प्रगती होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि नागरिकांनी दररोज सकाळी एक तास आपल्या शरीराच्या व्यायामासाठी आणि योगासनासाठी द्यावा, सकाळच्या प्रातः समयी योगासने करावीत असे आवाहन योगगुरू डॉ. संजय तांदळे यांनी विद्यार्थ्यांना योग विषयक मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांनी योगाच्या अष्टांगाविषयी माहिती देत ताडासन, वृक्षासन, उत्तानासन, शवासन, शलभासन, वज्रासन, उत्कटासन, त्रिकोणासन, भुजंगासन आदी आसने करुन घेतली. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. हसत खेळत योग प्रशिक्षण व माहितीचा आनंद विद्यार्थ्यांना दिला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
__________________________