धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका
*मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश
बीड, दि.२९ (प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर आमराई भागातील गुरुवर्य भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय आणि धांडे गल्ली येथील छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या नियमबाह्य मनमानी करून धानोरा रोड परिसरात स्थलांतर सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही शाळेचे स्थलांतर गंभीर व नियमाची पायमल्ली करणारे आहे. हे स्थलांतर नियमबाह्य ठरवून त्यांना त्यांच्या मूळ जागी स्थलांतरित व्हावे अन्यथा
उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या निकालानुसार आणि शासकीय नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यात करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांना दिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे.
बीड शहरातील बालेपीर आमराई येथील गुरुवर्य भा.वा. सानप प्रा विद्यालय आणि धांडे गल्ली बीड येथील छत्रपती शाहू महाराज प्रा. विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या धानोरा रोड परिसरात स्थलांतर करण्यात आले होते. या दोन्ही शाळा धानोरा रोड येथील राजयोग मंगल कार्यालय व वरद रेसीडेंसी जवळ अनाधिकृतपणे सुरू करण्यात आल्या होत्या. या शाळेच्या अनाधिकृतरित्या स्थलांतरामुळे मुळात धानोरा रोड परिसरात सुरू असलेल्या श्री विवेकानंद विद्यामंदिर बीड, यशवंत विद्यालय बीड, मथुराबाई पिंगळे विद्यालय बीड, शरदचंद्र विद्यालय बीड, माऊली प्रा. विद्यालय बीड, श्री विवेकानंद माध्यमिक विद्यामंदिर बीड, यशवंत माध्यमिक विद्यालय बीड, डॉ. भिमराव पिंगळे माध्यमिक विद्यालय बीड या शाळेच्या विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे या शाळेचे शिक्षक अतिरिक्त होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही शाळांनी मनमानी करून अनाधिकृत स्थलांतर केल्यामुळे त्यांच्यावर योग्य कार्यवाही करुन त्या शाळांना त्यांच्या मूळ ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देऊन सहकार्य करावे असे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिले होते. त्यानंतर प्रशासन काय भूमिका घेते. याकडे धानोरा रोड परिसरातील शाळांचे आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर काही कालावधी लोटला परंतु प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्याने या परिसरातील सर्व शाळांनी ना विलाजास्तव उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. या अनधिकृत स्थलांतराबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. या शाळेच्या अनाधिकृत स्थलांतरा संदर्भात सर्व बाबींचा अभ्यास करून आणि सविस्तर कागदपत्रांची तपासणी करून शासनाची मान्यता नसतानाही गुरुवर्य भा.वा. सानप व छत्रपती शाहू विद्यालय या दोन शाळा धानोरा रोड परिसरात सुरू करण्यात आल्या ही बाब गंभीर आणि शासन नियमबाह्य असल्याचे मा. न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठ न्यायालयाने या दोन्ही शाळांचे धानोरा रोड परिसरात झालेले स्थलांतर अनाधिकृत ठरवून त्यांना त्यांच्या मूळ जागी स्थलांतरित व्हावे अन्यथा त्या दोन्ही शाळांवर कडक कार्यवाही करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना आपल्या जागी स्थलांतरित व्हावे असे अन्यथा आपल्या विरोधात उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या निकालानुसार आणि शासकीय नियमानुसार योग्यती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पत्र शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांना दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मूळ धानोरा रोड परिसरात असलेल्या सर्व शाळांनी समाधान व्यक्त केले.
____________________________
———-