तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.17 (प्रतिनिधी)ः-सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई पाहता टँकर प्रणाली मध्ये तात्काळ सुधारणा करून पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी व सध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या तीव्र पाणी टंचाई सुरु असून शासना मार्फत टंचाई ग्रस्त गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून मंजूर टँकरची संख्या व टँकर द्वारे करण्यात येणार्या खेपा यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. टँकर मंजूर असलेली संख्या व मंजूर खेपा गाव निहाय टाकण्यात येत नाहीत. जी.पी.एस. प्रणाली टँकरला बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे टँकरचे लोकेशन मिळत नाही. यामुळे पाणी पुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणात गैर व्यवस्थापन निर्माण झालेले आहे. शासनाची सर्व यंत्रणा हि लोकसभा निवडणूकीत गुंतलेली असल्यामुळे पाणी टंचाई विभागावर दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जनते बरोबरच ग्रामीण भागातील जनावरांनाही मोठ्या प्रमाणात पाणी लागते.
बीड शहरातही मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याने बीड शहरात 20 ते 22 दिवसाला पाणी येत असल्याने पाणी वितरण प्रणालीत सुधारणा करणे आवश्यक आहे. बीड शहरातील पाणी पुरवठा हा किमान आठ दिवसाला करण्यात यावा. या बाबत नगर परिषद प्रशासनाला तातडीने सूचना देण्यात याव्यात व ग्रामीण भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात पाणी टंचाई दुर करण्यासाठी इंधन विहिरी घेणे आवश्यक आहे. परंतु इंधन विहिरींचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पण वरिष्ठ व कनिष्ठ भुवैज्ञानिक यांच्या जागा रिक्त असल्यामुळे इंधन विहिरींचे सर्वेक्षण होत नाही.
बीड जिल्ह्यातील प्रकल्पातील बुडित क्षेत्रात एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या करीता तातडीने विहिरी सुरु करण्यात याव्यात या करीता पंचायत समिती प्रशासनाला सुचना देण्यात याव्यात. तरी वरील सर्व बाबीवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
——————————————————