ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले.
बीड दि.१९(प्रतिनिधी)
ललीत अब्बड यांना परवा दिवशी संध्याकाळी झालेला मारहाणीचा प्रकार हा आपसातील वैयक्तीक विषय असुन यामागे कोणताही राजकीय भाग नाही. ललित अब्बड व नरेश शर्मा यांच्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. ललीत अब्बड हा प्रा. सुरेश नवले यांचा अधिकृत पी.ए.नसुन तो कार्यकर्ता म्हणून काम पाहतो. त्यानेच साहेबांच्या ऑफीसवर काम करण्याकरिता नरेश शर्माला आणून साहेबांच्या ऑफीसवर ऑफीस बॉय म्हणून ठेवण्याकरीता शिफारश केली होती. पुढे हा नरेश शर्मा साहेबांच्या ऑफीसवर कामाला होता. ह्या दोघांची पुर्वी पासुन ओळख असुन दोघेही पेठबीड भागात राहतात. शिवाय ते चांगले मित्र होते. परंतु मध्यंतरी दोघांमध्ये व्यक्तीगत कारणा वरून भांडणे झाली होती. यापूर्वी ललीत अब्बड याने नरेश शर्मा ह्याला मोंढ्यातील मिनाक्षी हॉटेल समोर मारहाण केली होती. त्यावेळी त्या दोघांना साहेबांनी समज देऊन यापुढे आपसात भांडणे करू नका असे समजून सांगितले होते. परंतु नरेश शर्मा याने पूर्वीच्या मारहाणीचा बदला म्हणून ललीत अब्बड यांना मारहाण केली. त्यामुळे झालेल्या घटने मागे कोणतेही राजकिय अंग नाही तर हा व्यक्तीगत मारहाणीचा भाग आहे. प्रा.सुरेश नवले यांच्या नावाचा कोणीही आपसातील भांडणा मध्ये वापर करू नये असे माजी मंत्री सुरेश नवले यांचे बंधू तथा माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.