महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां
समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न*
*टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*
बीड दि.२९(प्रतिनिधी)- १४ ऑक्टोबर २०२४ च्या जी.आर. नुसार ०१ जून २०२४ पासून वाढीव टप्प्याच्या अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यासाठी शिक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केली. यावेळी लवकरात लवकर अर्थ खात्यातून निधी मंजूर करून आपणास वाढीव टप्प्याचा पगार आपल्या खात्यावर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार विक्रम काळे यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील विनाअनुदानित शाळांना व अंशतः अनुदानित असलेल्या शाळांना
पुढील टप्पा वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने १४ ऑक्टोबर २०२४
रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतला. यासंदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. परंतु अद्याप त्यासाठी लागणारा निधी मंजूर झाला नसल्याने विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना अद्याप पगार सुरू झाला नाही. तर दुसरीकडे अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना वाढीव टप्प्यानुसार मिळणारे वाढीव वेतन ही सुरू झालेले नाही. वाढीव टप्पा अनुदानासाठी राज्यातील शिक्षकांनी आतापर्यंत विविध प्रकारचे आंदोलने केली. परंतु यावेळी शासनाकडून केवळ आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या सर्व शिक्षकांनी येत्या ०५ जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी या प्रश्नी मंत्री,आमदारांसह शिक्षक आमदारांना प्रत्यक्ष भेटून सरकारला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करावे या मागणीचे निवेदन देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आज दिनांक 29 मे रोजी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आ. विक्रम काळे यांची यांच्या लातूर येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून
निवेदन देत आपण सरकारकडे आमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह धरावा वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी बोलताना आमदार विक्रम काळे यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीचे श्री. जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या सोबत बैठक लावतो, जेणे करून आपले सर्व प्रश्न तुम्ही स्वतः मांडू शकाल. त्याच बरोबर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्यासाठी लागणारा निधी अर्थ खात्यातून मंजूर करून घेणार आहे त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष श्री वैजनाथ चाटे, मराठवाडा महिला सचिव मुक्ता आर्दड(मोटे) मॅडम, लातूर जिल्हाध्यक्ष दिनकर निकम , लातूर जिल्हा प्रा.अध्यक्ष इस्माईल शेख, हिंगोली जिल्हाध्यक्ष श्रीकांत मईंग , संभाजीनगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर माने, लातूर विभागीय महिला अध्यक्षा संगीता राठोड, सोनवणे अप्पा , नांदेडचे वडजे सर, देशमुख एच.डी, गोकुळे सर, जाधव सर, अब्दुल सर, पठाण सर, शेख सर यांच्यासह शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
________________________________