अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात!
बीड दि.२९ (प्रतिनिधी)– शहरातील शाहू नगर भागात असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ केल्या प्रकरणी प्रा. विजय पवार आणि प्रा. प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होतास दोघेही फरार झाले होते. अखेर या दोन्ही फरार आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास बीड शहरा नजीक ताब्यात घेतले.
बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 17 वर्षे विद्यार्थीनीने प्रा. विजय पवार आणि प्रा. प्रशांत खाटोकर यांनी वर्षभर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दिली होती. या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या दोघांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कळताच शहरातील पालकासह वेगवेगळ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी उमाकिरण शैक्षणिक संकुला समोर तीव्र आंदोलन करत दोन्ही आरोपींच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. शनिवार रोजी शैक्षणिक बंद पुकारला होता. यावेळी आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच आरोपी अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस ठाण्याचे सात पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.
दरम्यान शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रशांत खाटोकर हा धाराशिव येथून पुण्याकडे मांजरसुंबा मार्गे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच प्रा. विजय पवार हा देखील नगरहून त्याला जॉईन होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून या दोघांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बीड शहरानजीक ताब्यात घेतले.
________________________________