*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे*
केज दि.02 (प्रतिनिधी)- केज तालुक्यामध्ये 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला मागच्या काही दिवसात तर शेतातील पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे. यावेळी मंडळ आणि गाव निहाय झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे गरजेचे आहे पावसामुळे ग्रामीण व शहरी भागात घरांची झालेली पडझड पशूंची झालेली हानी यावर स्वतंत्र पंचनामे करण्याची गरज आहे तसेच स्थानिक आपत्ती निवारण निधीतून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असल्यास याबाबतचे तात्काळ द्यावयाच्या अनुदान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ते वाहून गेले आहेत व खचले आहेत अशा रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. महावितरणच्या विविध उपकेंद्र अंतर्गत पावसाने झालेले नुकसान पोल किंवा तारा तुटण्याचे प्रकार याबाबत गावातील सरपंच किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी कळविले तरी त्याबाबतीत तातडीने ॲक्शन घ्यावी जेणेकरून कुठलेही गाव अंधारात राहणार नाही अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे. कार्यवाही लवकर नाही केली तर ग्रामीण युवक संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल असे प्रा. आंधळे सर यांनी सांगितले.