नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ??
नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल
बीड दि.२०( प्रतिनिधी) : तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढणे हेच इतके महत्त्वाचे आहे का ? तुम्हा सत्ताधाऱ्यांना तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे दिसतात पण बीडकरांच्या ज्वलंत अडचणी, डोळ्यातले अश्रू का दिसत नाहीत ?.. कार्यकर्त्यांची दशा- दिशा पाहण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना बीड शहराची दुर्दशा व नगरपालिकेच्या गलथान कारभाराची दिशा दिसत नाही का ? बीड शहराच्या विकासाची दशा व दिशा कळत नाही का ? बीडची जनता अनंत समस्यांना रोज झुंजत आहे. प्रश्न सुटत नाहीत. सुटण्याचा काही मार्ग दिसत नाही. समस्या सोडविण्यासाठी कोणी वाली नाही. एकीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी व भ्रष्टाचाराचा कळस उभा राहिला आहे. दुसरीकडे नेते पुढारी बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना लोचून-लुचून खात आहेत. नेत्या पुढाऱ्यांनी, मोठमोठ्या घराण्यांच्या राजपुत्र वारसांनी भ्रष्टाचाराचा कहर माजवला आहे. आई-बहिणीच्या अब्रूंची किंमत राहिली नाही. बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांना काही सीमाच उरलेली नाही. आया – बहिणींवरील अत्याचारांचे दररोज नवनवीन प्रकरणे उघडकीस येताना दिसत आहेत. कायदा- व्यवस्थेचा धाकच राहिलेला दिसत नाही. विकासाची कामे रेंगाळत चाललेली आहेत. रेंगाळलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे . अपघातांमध्ये माणसं दगावत आहेत, महिला, मुले, मुली, वृद्ध व जेष्ठ नागरिकांना अपघात ग्रस्त होऊन अक्षरशः अपंगत्व येत आहे. बीड शहरातील सर्व प्रशासकीय कारभाराचे तीन तेरा नऊ बारा वाजलेले आहेत.याला भ्रष्टाचारी अधिकारी व नेते पुढारी सर्वस्वी कारणीभूत आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्ताधारी नेत्यांना कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे काढणे ‘हेच’ महत्त्वाचे वाटते, निवडणुका आल्यामुळे पक्ष बांधणी महत्त्वाची वाटते, पण विकासाची बांधणी करताना तुम्ही नेहमीच कमी पडताना दिसता किंवा तुम्हाला लोकांच्या हाती नेहमी गाजराची पुंगीच द्यायची असते. नुसताच आश्वासनांचा बडीमार , जुमलेबाजी आणि प्रत्यक्ष विकास कामांच्या नावाने शंख हीच तुमची कार्यपद्धती झालेली आहे. पण याचे दुष्परिणाम, त्यातून निर्माण येणाऱ्या हालअपेष्टा निष्पाप आणि करदात्या जनतेला सहन कराव्या लागतात हाच आपल्या विकास कार्यक्रमांचा खरा लेखाजोखा आहे . कधी विकासावरही चर्चा करा, विकासासाठी मेळावे घ्या, भ्रष्टाचार संपवण्यासाठी ही मेळावे घ्या, असे बीड शहर बचाव मंच तुम्हाला आज आव्हान करत आहे. बीड शहराच्या नगरपालिकेची दशा आधी सुधारित करा , नेते पुढारी व अधिकाऱ्यांची मिली भगत संपवून शहराला चांगला कारभार बहाल करा, नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा, नेते पुढारी व अधिकाऱ्यांनी कोलमडवलेली नगरपालिकेची यंत्रणा व कारभार पारदर्शक आणि सुरळीत करून द्या असे बीड शहरातील जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंच सत्ताधारी नेत्या पुढार्यांना व अधिकाऱ्यांना आव्हान करत आहे.