* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण!
*नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग*
*प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम*
पाटोदा दि.7 (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील नायगाव गावच्या ‘ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक घर ‘एक वृक्ष, या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कारभाक्षारोपण कार्यक्रमाला नायगाव ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात परिसराच्या पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. गावकऱ्यांचा मोठा सहभाग आणि महिलांचा विशेष पुढाकार यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नुकताच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते बीड जिल्ह्यामध्ये एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीचा शुभारंभ 7 ऑगस्ट रोजी करण्यात आला. दिवसभरात बीड जिल्ह्यामध्ये 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आले. त्याच अनुषंगाने पाटोदा तालुक्यातील नायगाव गावात लोकप्रिय व कार्यक्षम सरपंच सौ. मंजुषा संदीप कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव ग्रामपंचायत आणि निकिता फाउंडेशनच्या
माध्यमातून वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी निकिता फाउंडेशनच्या
अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. कल्पना कवठेकर यांनी वृक्ष लागवडी निमित्ताने आपले विचार मांडले. यावेळी बोलताना सौ. कल्पना कवठेकर मॅडम म्हणाल्या की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थाने पर्जन्यमान वाढवण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात आपण गावागावात शहरात जिल्ह्यात आणि राज्यात वृक्षांची लागवड करू तेवढ्याच प्रमाणामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे. निर्मळ निरोगी मानवी जीवन राहण्यासाठी आणि भविष्यासाठी स्वच्छ व हरित गाव निर्माण करण्यासाठी
नायगावा प्रमाणेच जिल्ह्यातील सर्व गावात वृक्ष लागवड करण्यात यावी असे आवाहन यावेळी सौ कल्पना कवठेकर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमा आधी निवडक मान्यवरांनी वृक्षारोपण विषयावर आपले विचार मांडले.
त्यानंतर गावातील शाळा परिसर, ग्रामपंचायत हद्द, रस्त्याच्या कडेला आणि इतर निवडक ठिकाणी अनेक प्रजातींची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील विविध स्वयंसहायता बचत गटातील महिलांनी वृक्षारोपणात हातभार लावला. त्यांनी वृक्षांची निगा राखण्याची जबाबदारीही स्वीकारली. हे कार्य महिलांच्या सामाजिक योगदानाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे आणि निकिता फाउंडेशनच्या सहकार्यामुळे नायगावमध्ये पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे गावाचा नैसर्गिक सौंदर्य वृद्धिंगत होत असून, भविष्यात ‘हरित नायगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.वृक्षारोपणानंतर झाडांचे संगोपन व संरक्षण हे पुढील महत्त्वाचे पाऊल असल्याने ग्रामपंचायतीमार्फत विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सरपंच सौ. मंजुषा कवठेकर यांनी सांगितले. फाउंडेशनच्या मदतीने झाडांना नियमित पाणीपुरवठा, गवत कापणी व संरक्षणासाठी स्थानिक युवकांच्या सहभागातून कार्यवाही होणार आहे.नायगाव ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात आलेला वृक्षारोपण कार्यक्रम हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून, भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा दीर्घकालीन संकल्प आहे. जनसहभाग, महिला पुढाकार आणि सामाजिक संस्थेच्या सहकार्याचा आदर्श उदाहरण ठरलेला हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायक ठरेल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील बचत गटातील महिला, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम केवळ औपचारिकते पुरता मर्यादित न राहता, खऱ्या अर्थाने जन सहभागातून घडून आला. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी नायगाव गावातील नागरिक युवक स्त्रियांनी मोठा सहभागी घेतला.