15/01/26

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी

बीड दि.११ (प्रतिनिधी) – बीड शहरातील धानोरा रोड हा अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त मार्ग असून, सध्या तो पूर्णपणे जर्जर अवस्थेत आहे. या रस्त्याने दररोज हजारो नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रस्तावित बीड दौर्‍यात त्यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा, अशी मागणी नगरसेवक रणजीत बनसोडे व भैय्यासाहेब मोरे यांनी केली आहे.
या मागणीमागील हेतू केवळ राजकारण नसून, जनतेच्या दु:खाची थेट जाणीव करून देण्याचा आहे. धानोरा रोडच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय या समस्येचे गांभीर्य लक्षात येणार नाही. म्हणूनच, या रस्त्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रवास केल्यास, यंत्रणेला जाग येईल आणि कामास तात्काळ गती मिळेल, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.धानोरा रोडवरून प्रवास केल्याशिवाय या रस्त्याच्या वेदना समजणार नाहीत! – असे सांगत नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले असून, राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाने याच मार्गाने प्रवास करावा, अशी विनंती केली आहे.बीड शहराचा विकास केवळ भाषणांत न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसावा, यासाठीच ही आग्रही मागणी आहे. धानोरा रोडवरील नागरिकांची दररोजची कोंडी, धूळ, खड्डे आणि अपघातांची भीती पाहता, हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत येणे ही काळाची गरज बनली आहे असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Check Also

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा …