मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज मतदारांनी मतदान करावे-
जिल्हा निवडणूक अधिकारी
बीड, दि. 10 (प्रतिनिधी): मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे, मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात शुक्रवार दि.१० रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले. त्यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. त्रिभुवन कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे तसेच मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदनाचा दिवस असून उद्या शनिवारी 11 मे 2024 सायंकाळी 5 वाजेपासून कडक आचारसंहिता लागू होणार असून राजकीय पक्षाच्या प्रचार प्रसारास बंदी असणार आहे, तसेच पुढील दोन दिवस दारूबंदी चा आदेश काढण्यात आला. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जागृती चे मोठे अभियान जिल्ह्यात राबविले जात असून आता घराघरात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 2355 मतदान केंद्र आहेत. यापैकी एका ठिकाणी किमान चार लोकांना एकाच वेळी मतदान करण्यात येणार असल्याने असे 1479 स्थळी मतदानाची यंत्रणा असेल. यामध्ये शहरी भागात 174 तर ग्रामीण भागात 1305 असणार आहे. या मतदान केंद्रापैकी 22 ठिकाणी मोबाईलच्या नेटवर्कची सुविधा नसल्याने तिथल्या मतदान केंद्र अध्यक्षाला वॉकी टॉकी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मतदान केंद्र अध्यक्ष, सहाय्यक केंद्र अध्यक्ष, दोन सहाय्यक अधिकारी असे एकूण चार लोक मतदान केंद्रावर कार्यरत असणार असून त्यांची एकूण संख्या 10432 आहे. यामध्ये 8216 पुरुष तर 2216 महिला आहेत. यापैकी 55 महिला मतदान केंद्र असणार आहेत जिथे केवळ महिला असणार.
यासह 1896 महिला या प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी यावेळी आवर्जून सांगितले कुठल्याही महिला अधिकाऱ्यांनी निवडणूकीचे काम कमी करण्यास सांगितले नाही, ही विशेष बाब असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी असणारे अधिकारी कर्मचारी यांना कोणते मतदान केंद्र मिळणार आहे यांची निश्चित माहिती ही अधिकारी कर्मचाऱ्यांची सर मिसळ प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दिनांक 12 मे रोजी रात्री कळेल.
288 सेक्टर अधिकारी नेमण्यात आले असून त्यांना दिलेल्या मतदान केंद्रांचा आढावा ते मतदानाच्या दिवशी घेणार आहेत. आणि तशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी पुरवतील. एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के ठिकाणी वेब कास्टिंग ची सुविधा उपलब्ध असून मतदान कक्ष, मतदान रांग तसेच सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसणार आहे. त्याचे ड्राय रन उद्या सुरू होईल. हे वेबकास्टिंग थेट विधानसभा निहाय सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कक्षात तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दिसणार आहे. मतदानाच्या दिवशी माध्यमांना दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारीची माहिती देण्यात येईल. तुरुंगात असणाऱ्या नागरिकांना मतदानाचा हक्क नसल्याचे स्पष्टीकरण विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले.
मतदान केंद्रावरील सुविधा
मतदान केंद्रांवर सुविधेबाबत बोलताना जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले, बीड मतदार संघातील अधिक मतदान केंद्र हे शाळेच्या परिसरात असल्यामुळे या ठिकाणी सावलीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी खुला परिसर असेल त्या ठिकाणी 15×20 चा मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह पाण्याची व्यवस्था, ओ आर एस /ग्लुकॉण्डी, स्तनदा माता, लहान लेकरांसाठी पाळणाघर असणार आहे. वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आशा वर्कर केंद्रात राहतील. एकूण 63 मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिलचेअर ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मतदार चिठ्ठ्या वाटप 80% टक्के पूर्ण
बीड लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात घरोघरी मतदार चिट्ठी वाटपाची कार्यवाही सुरू आहे. 80% टक्के चिठ्ठा वाटपाचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात शंभर टक्के चिठ्ठ्या वाटप केल्या जातील.
निवडणूक निरीक्षकांना थेट माहिती
केंद्र सरकारच्या विविध विभागात कार्यरत असणाऱ्या 31 सूक्ष्म निरीक्षकांची बीड लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी कर्तव्यार्थ काम करणार असून हे सूक्ष्म निरीक्षक थेट निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांच्या संपर्कात असणार आहेत. आणि त्यांना आवश्यक माहिती पुरवतील.
टपाली मतदान याची प्रक्रिया सुरू आहे
बीड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात टपाली मतदान सुरू आहे. तसेच बीड जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी जे इतर जिल्ह्यात निवडणुकीच्या कामासाठी आहेत, त्यांचेही टपाली मतदान सुरू असून 13 तारखे पर्यंत त्या जिल्ह्यातून झालेले मतदान आपल्या जिल्ह्यात येईल आणि ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मतदान पार पडल्यावर ए. बी. सी. डी. अशा चार ट्रंक मध्ये मतदान यंत्रसामुग्री ही बीड जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी येईल. यापैकी ए आणि बी ही यंत्रसामग्रीचे ट्रंक शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूम मध्ये विधानसभा निहाय ठेवण्यात येईल. स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणाऱ्या मतदानाच्या पेट्या ठेवताना उमेदवार अथवा उमेदवाराचे प्रतिनिधी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निरीक्षक यांच्या समक्ष ठेवण्यात येणार. शासकीय तंत्र निकेतन येथील सुरक्षा व्यवस्था तीन स्तरीय असणार आहे. आर्म फोर्स, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. मतमोजणीच्या दिवशी शासकीय तंत्र निकेतनच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया दर्शविण्यासाठी मोठा टीव्ही असणार आहे. हा सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणार आहे.
यापैकी सी व डी मार्किंग केलेले दोन ट्रंक पैकी सी या ट्रंकमध्ये अभिरूप मतदान (मॉक पोल) झालेली सामग्री. तर डी या ट्रंकमध्ये आरक्षित असलेली यंत्रसामुग्री असल्याने वखार महामंडळ ठेवण्यात येईल.
काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडण्यात आले होते. सध्या ही रक्कम गेवराईच्या कोषागार येथे ठेवलेली असून, संभाजीनगर येथील आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून आलेल्या आदेशानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. ही रक्कम दहा लाखापेक्षा अधिक असल्याने अहवाल आल्याशिवाय ती गेवराईच्या कोषागार येथेच असणार असे त्यांनी यावेळी सांगितले.
00000000000000000000