पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली; अविनाश बारगळ नवे पोलीस अधीक्षक
बीड दि.07(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अविनाश बारगळ यांची नियुक्ती झाली. नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.
बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची आज बदली झाली. मागील दोन वर्षांपासून ठाकूर यांनी बीड जिल्ह्यात सेवा बजावली त्यानंतर आज त्यांच्या बदलीचा आदेश आला. त्यांच्या जागी अमरावतीचे श्री. अविनाश बारगळ बीडला येतं आहेत. बारगळ यांनी अमरवतीमध्ये चार वेळा पोलीस विभागात सेवा बजावली आहे. बारगळ यांची अमरवतीतील कारकीर्द राज्यात चर्चेत राहणारी ठरलेली होती. अतिरिक्त पोलिस अधिक्षक त्यानंतर पोलिस उपायुक्त म्हणून अमरावती शहरात त्यांनी कार्यकाळ उपभोगल्यानंतर अमरावती पोलीस अधिक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्येच सीआयडीचे अधीक्षक म्हणून गृहविभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली होती. एकाच शहरात चार वेळा पोलीस दलात वेगवेगळ्या पदावर काम करणारे अधिकारी म्हणून बारगळ यांची राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता ते अमरावतीच्या सीआयडी विभागातून बीडला पोलीस अधिक्षक म्हणून येतं आहेत. एक चांगला आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या रुपाने एक चांगला अधिकारी मिळाल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
_________________________