लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला
बीडमध्ये लाईट गायब
बीड दि.१(प्रतिनिधी)-
देशभरामध्ये दिवाळीची धामधूम सुरू असताना संध्याकाळी महालक्ष्मी पूजनाच्या वेळी बीड शहरातील काही भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला अडथळा निर्माण झाला होता.
हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि प्रकाशाचा सण सण म्हणून ओळखला जाणारा दीपावलीचा सण हा दिव्यांच्या सण आहे.या सणाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. शिवाय लाईटच्या माळांनी संपूर्ण शहर सजवले आहे.आज शुक्रवार रोजी बीड जिल्ह्यासह शहरात सायंकाळी सर्वत्र दिवे लावून प्रकाश निर्माण करण्यात आला होता. मात्र आज ऐन लक्ष्मीपूजनाच्या वेळी लाईट गेल्यामुळे बीडकरांचा हिरमोड झाला होता त्यामुळे नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली. आधीच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कोणता यावर गेल्या अनेक दिवस वाद विवाद होत होते, काहींनी काल लक्ष्मीपूजन केले तर बहुतांशी लोकांनी लक्ष्मीपूजनाचा आजचा मुहूर्त निवडला होता. काहींनी दिवे लागण्याच्या आधीच लक्ष्मीपूजन केले तर काही नागरिकांनी साडेआठ पर्यंत मुहूर्त असल्याने लक्ष्मीपूजनाची तयारी केली असतानाच लाईट गेल्यामुळे लोकांचा विरस झाला आहे. जास्तीच्या दबावामुळे कुठलीतरी तार तुटली असून ती लवकरात लवकर जोडून वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आली.
__________________________