सत्तर टक्के लाडक्या बहिणी सरकारच्या विरोधात
-ॲड. अजित देशमुख
बीड दि.५ ( प्रतिनिधी ) गेलेल्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. यावर करोडो रुपये खर्च झाला. मात्र एका साधारण पाहणी मध्ये सत्तर टक्के लाडक्या बहिणी सरकारच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा त्या योजना कर्त्यांना होईल का? यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
एकीकडे लाडकी बहीण योजनेवर अब्जावधी रुपये खर्च झाले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव नाही, याची खंत शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांना पिक विमा, अनुदान यासारख्या गोष्टींसाठी सातत्याने लधा द्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील गेलेल्या सरकारवर नाराज आहे.
योजना राबवण्यापेक्षा भ्रष्टाचार रोखून चालू योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मात्र लाडकी बहीण योजना राबवताना नियमाचे पालन न केल्याने आणि गडबड केल्याने यात देखील मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झाल्याचे सरकारचे म्हणणे होते. त्यामुळे गडबडीने राबवलेली योजना असेच लाडकी बहीण योजनेला म्हणावे लागेल.
अनुदान द्या, विमा द्या, असे शेतकरी म्हणत नाही. मात्र शेतकऱ्यांसाठीच्या कोट्यावधींच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजेत. यावर शेतकरी ठाम असतो. शेतकरी हा लुळा पांगळा नाही. तो कठोर मनाचा आहे. मात्र त्याच्यापर्यंत योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पोहोचत नसल्याने शेतकरी देखील त्रासलेला आहे.
दुसरीकडे मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे राहिलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांची कस लागणार आहे. आता मतदारांनाच योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करणे आवश्यक असल्याने मतदार जागृतीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.