माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा डॉ. योगेश क्षीरसागरांना आशीर्वाद!
बीड दि.१२(प्रतिनिधी )-अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी
डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार दि.१२ रोजी कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी हितगुज साधून त्यांचे मत ऐकून घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अण्णांनी घेतलेल्या निर्णयामुळे डॉ योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षांपासून आपले वर्चस्व कायम ठेवणारे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातून विधानसभेसाठी अपक्ष अर्ज भरला होता.
मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने खळबळ उडाली होती. परंतु दोन पुतणे विरुद्ध काका अशी लढत झाल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका तिन्ही क्षीरसागरांना बसेल ही शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ते नेमके कोणत्या पुतण्याच्या पाठीशी उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज मंगळवार दि.१२ रोजी अण्णांनी कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी हितगुज साधून कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेऊन शेवटी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीचे डॉ. योगेश क्षीरसागर आजच विजयी झाले आता फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी अशी जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.