17/07/25

लोकजागृती आणि लोकशिक्षणातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करू -ॲड. अजित देशमुख

लोकजागृती आणि लोकशिक्षणातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करू -ॲड. अजित देशमुख

बीड दि.14 (प्रतिनिधी) सध्या समाजाला चांगल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकशिक्षण आणि लोक जागृती करणे आवश्यक आहे. संघटन असल्याशिवाय जनतेचे लहान लहान प्रश्न सुटत नाहीत. आणि त्यांना मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे स्वराज्य जनजागृती परिषदेची स्थापना केली असून या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन स्वराज्य जन जागृती परिषदेचे अध्यक्ष ॲड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

स्वराज्य जनजागृती परिषदेची आज रांजणगाव येथे विश्वस्त मंडळाची पहिली सभा पार पडली. या सभेमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकरी विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत. या सर्व प्रश्नांवर एकत्रित येऊन चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे असे सर्व कार्यकर्ते परिषदेच्या माध्यमातून एकत्र करून समाजाला दिशा देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. नवी पिढी आदर्श घेईल असे काम परिषदेच्या माध्यमातून झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पोहोचण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल, यावर काही निर्णय घेण्यात आले. परिषदेचे उपाध्यक्ष संदीप जगताप, सातारा यांनी आपले विचार मांडताना म्हंटले की, परिषदेत काम करण्यासाठी चारित्र्यसंपन्न लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त तरुणांचा समावेश करून घेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणे संघटन मोठे होण्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतील.
परिषदेचे कोषाध्यक्ष शिवाजी खेडकर, पुणे यांनी परिषद केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात काम उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेतकरी आणि कामगारांच्या मुद्द्या बरोबरच लोकजागृतीच्या मुद्द्यावर देखील त्यांनी आपले मत स्पष्ट केले.
शिक्षण व्यवस्थेमध्ये गाव पातळी करून पासून सुधारणा व्हावी, म्हणून शाळांकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा गावातच मिळून देण्यासाठी सक्रिय राहावे लागेल, असे प्रतिपादन परिषदेचे सचिव तुषार पाटील यांनी केले. तर सर्वच काम करत असताना कार्यकर्त्यांनी दक्ष राहून शक्य तेवढा वेळ देऊन काम करण्याची गरज असल्याचे परिषदेचे विश्वस्त गोवर्धन मस्के आणि विष्णू ढवळे यांनी म्हटले.अण्णा हजारे यांनी परिषदेला दिलेला शुभेच्छा संदेश गोवर्धन मस्के यांनी वाचून दाखवला. आजच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी बैठकीतील सर्व मुद्द्यांवर सक्रिय सहभाग नोंदवत चर्चेत भाग घेतला. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संघटन वाढीसाठी काय करता येईल, यावर विचार मंथन देखील करण्यात आले. श्रीक्षेत्र रांजणगाव (गणपतीचे)येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या या बैठकीचे सूत्रसंचालन गोवर्धन मस्के यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिवाजी खेडकर यांनी केले.

—————–

Check Also

कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न

कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न जालन दि.११(रामेश्वर तांगडे)- जिल्ह्यातील कॅनरा …