चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद मांडणी व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी
बीड दि.१९ (प्रतिनिधी) -चेक बाउन्स प्रकरणी आरोपी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा ठोठावल्याचा महत्वपूर्ण निकाल बीड जिल्हा न्यायालयाने दिला. या प्रकरणी न्यायालयात ॲड. तेजस नेहरकर यांनी फिर्यादीचे बाजू मांडली.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी दामोदर रावसाहेब साळुंके रा. बीड यांचे कडून आरोपी किशोर दामोदर डोके रा. बीड पोलीस कॉन्स्टेबल नेमणूक आष्टी पोलीस स्टेशन याने घरगुती अडचण सांगून तीन लाख रुपये हात उसने घेतले.
फिर्यादीने आरोपी पोलिसांवर विश्वास ठेवून कुठलाही कागदोपत्री पुरावा न बनवता आरोपीला नगदी रोख तीन लाख रुपये दिले. या व्यवहाराला कोणीही साक्षीदार नव्हते. आरोपीने दिलेला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीडचा चेक फिर्यादीने बँकेमध्ये वटवण्यासाठी टाकला असता परंतु आरोपींच्या खात्यावर पैसे नसल्याने तो चेक वापस आला. त्यानंतर फिर्यादीने आरोपीस पैशाची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास नकार दिला. उपरोक्त प्रकरणी ॲड. तेजस नेहरकर यांच्यामार्फत मुख्य न्याय दंडाधिकारी बीड यांच्या न्यायालयात एन आय ऍक्ट कायद्यानुसार दाखल करण्यात आले. त्याचा क्रमांक. एसएससी. 1024 / 2024 असा असून सदरचे प्रकरणी साक्षी पुराव्यासाठी दोन वर्ष अकरा महीने चालले. ॲड. तेजस नेहरकर यांनी फिर्यादीचे बाजूने कायद्याच्या चौकटी प्रमाणे पुराव्याची केलेली मुद्देसूद मांडणी व सर्व टेक्निकल पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणले व त्या पुराव्यावरून मा. मुख्य न्याय दंडाधिकारी साहेबांनी मूळ रक्कम तीन लाख रुपये व त्यावर दंड चार लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये आरोपीने फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या वेळी आरोपीला सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात फिर्यादी तर्फे ॲड. तेजस नेहरकर यांनी काम पाहिले.